तुझं वय काय….

जोशी आजोबा गॅलरीत पेपर वाचत बसले होते. त्यांनी सहज नजर समोर वळवली तर त्यांना नेने आजोबा उत्साहात दुडूदुडू धावत कुठेतरी जाताना दिसले.नेने म्हणजे जोशींचे लंगोटीया यार.एकमेकांना टाळया देत त्यांचे हास्यविनोद चालायचे .चुकले तर एकमेकांची कानउघडणी करायचे. जोशी नेने म्हणजे सोसायटीतील जय-वीरू.
“कुठे पळत चाललाय हा नेन्या… एवढं वय झालंय पण पोरकटपणा जात नाही याचा” जोशी डोक्यावर आठ्या चढवून उठले आणि नेन्यांच्या मागे जाऊ लागले.नेने जिन्यावरून गच्चीवर जाताना दिसले म्हणून जोशीही त्यांच्या मागोमाग गच्चीवर जाऊन पोहोचले आणि तिथले दृश्य पाहून थक्क झाले.
गच्चीवर आठ दहा मुलांसोबत नेने पतंग उडवत होते.पतंगाची काटकाटी करत असताना मोठ्याने ओरडत होते आणि समोरच्याची पतंग कटल्यावर उडया मारून नाचत होते.
“नेन्या….” जोशींनी हाक मारली. “अरे जोश्या तू?” नेने मागे वळून म्हणाले.”हे काय चाललंय? अरे तुझं वय काय आणि तू करतोयस काय.शोभत का तुझ्या वयाला हे पतंग उडवनं आणि थयथया नाचणं” जोशी रागावून म्हणाले. “माझं वय 70 आहे आणि मी पतंग उडवतो आहे बरं जोशीबुवा” नेने डोळे मिचकावून खट्याळपणे म्हणाले.”आणि न शोभायला काय झालं ,पोरं तर म्हणता आहेत आजोबा you rocks…काय रे पोरांनो ?” मुलांनीही ओठाचा चंबू करत ऊ हू s s s s असा आवज काढून नेनेंच्या बोलण्याला दुजोरा दिला.”अरे पण तब्येतीचे काय ? इतक्या उन्हाचा पतंग उडवतो आहेस इथे, काही झालं म्हणजे.त्यापेक्षा गपगुमान घरात बसावे भजनं ऐकावीत आणि देवाचे नामस्मरण करावे ,आता आयुष्य तरी किती राहीलें आहे आपले” जोशी. “तेच म्हणतोय मी जोश्या आयुष्य तरी किती राहीले आहे आपले.”नेने म्हणाले “जेवढे राहिले आहे तेवढे उत्साहात, आनंदात काढू नये आपण?”
“आपल्याकडे एक समज आहे की, वयाची साठी झाली की आपण निवृत्ती घ्यावी. ते बरोबर ही आहे आपण निवृत्ती घ्यावी पण संसारातून संपूर्ण जीवनातून नाही.अरे हीच तर वेळ असते आपले राहिलेले स्वप्न, इच्छा पूर्ण करण्याची. आपण उलटं करतो .अजून संसारात गुंतत जातो. मुले संसार करत असतील तर त्यांनी आपण जसा केला तसा संसार करावा म्हणून हट्ट करत जातो.धड त्यांनाही काही नवीन करू देत नाही आणि आपणही काही करत नाही.त्यापेक्षा आपण जर आपले लक्ष आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यात, नवीन गोष्टी शिकण्यात घालविले तर आपणही खुश आणि ते ही खुश. आपल्या वेळी होत्या तश्या गोष्टी आता राहिल्या नाहीत म्हणून आपण सारख हळहळत असतो .आताचा काळ आपल्या काळाइतका चांगला नाही ,पण इतका वाईटही नाही .आताही शिकण्यासारखे भरपूर आहे .नवीन काही केले की आपले मन आणि शरीर दोघेही निरोगी राहतात. आणि आपण आनंदी असलो की भोवतालचे वातावरणही प्रसन्न राहते. आपले पूर्वज जसे जगत आले आपणही का तसेच जगावे?.आपल्या मनात आपल्या आजोबांची इमेज नेहमी मितभाषी,गंभीर,शिस्तप्रिय अशीच राहिली आहे ,आपल्या नातवांच्या मनात आपली इमेज roking, happy-go-lucky,jolly अशी राहीली तर बिघडलं कुठे? “
“मी नवीन गोष्टी स्वीकारतोय याचा अर्थ मी माझ्या सर्वच जुन्या गोष्टींचा त्याग करतोय असे नाही . अजूनही मी सकाळी उठून अगोदर देवपूजा करतो. सर्व सण समारंभ पारंपारिक पध्द्तीने साजरे करतो. पण या वयात काशीला जाण्यापेक्षा मला केप टाऊन ला जाऊन तिथले table mountain बघायला जास्त आवडेल.जितके पुस्तक वाचने आवडते तितकेच इंटरनेटवर blogs वाचनेही प्रिय आहे मला. जुन्या क्लासिक सिनेमा सोबत आताचे sci-fi सिनेमा सुद्धा बघायला आवडता मला.मला टिपिकल म्हाताऱ्यांप्रमाणे किरकीरत, पोराबाळांच्या नावाने ओरडत,आजारपणाची भीती मनात बाळगत काढायचे नाहीये. वाढत्या वयासोबत दुखणी पण येणारच पण तो पण एक आयुष्याचाच भाग आहे . त्याचा पण स्वीकार करायचा.बाकी आयुष्य तेच आहे आणि आपणही तेच आहोत दृष्टी बद्दलवायची फक्त. दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. कोणी एकाने म्हटलेच आहे,
” जिंदगी के रंगमंच पर
आखरी अंक चला रहा हू
बाकी खेल भी वही है और कहाणी भी वही है
बस किरदार निभाने का अपना तरिका बदल रहा हू “
“कोणी म्हटलंय हे? ” एवढा वेळ नेनेंचे बोलणे मनापासून ऐकत असलेले जोशी म्हणाले.
“मी” शांतपणे नेने म्हणाले .”फेसबुकवर पेज बनवलय मी,त्यावर असले काही पोस्ट करत असतो .तू ही अकाउंट बनव.आज ये माझ्या घरी माझा नातू मला पबजी शिकवणार आहे . येशील ना?”
“हो . नक्कीच.”जोशी उत्साहात म्हणाले. त्यांनीही ठराविक विचारांची चौकट आता सोडण्ययाचा निर्णय घेतला होता.

करीअर संसार..

सुनीता ..एका नामांकित कंपनीत मोठ्या पदावर काम करणारी मुलगी. अत्यंत हुशार आणि महत्वाकांक्षी .आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची जिद्द मनात बाळगणारी. योग्य वयात येताच तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. आलेल्या स्थळांमध्ये निशांत चे स्थळ सुनीताच्या आई वडिलांना पसंत पडले.सुनीता आणि निशांतचे विचार एकमेकांशी जुळत असल्यामुळे दोघानीही घरच्यांना होकार कळविला आणि त्यांचे लग्न झाले.
काही दिवसानंतर सुनीता व निशांत कामावर रुजू झाले. निशांत चे एकत्र कुटुंब होते. घरात सुनीता ,निशांत मिळून एकूण पाच जण राहत होते.शिवाय सर्व नातेवाईकही आसपासच राहत असल्यामुळे घरी येणारे जाणारेही खूप होते. जोपर्यंत निशांत चे लग्न झाले नव्हते तोपर्यंत सुनीताच्या सासूबाई घरातले सर्व बघत होत्या. दोन्ही वेळेचा स्वयंपाक करणे , मुलांचे जेवणाचे डबे बनविणे,आल्या गेल्या लोकांचा पाहुणचार करणे हे सर्व त्या बघत होत्या. लग्न झाल्यानंतर आपोआपच ती सर्व जबाबदारी सुनितावर आली.सकाळी लवकर उठून ती सर्व कामे , स्वयंपाक आटोपून धावत पळत ऑफिस मध्ये पोहोचत असे.तिथे ती दिवसभर काम ,मिटीग्स मध्ये व्यस्त राहत असे आणि पुन्हा घरी येऊन सर्व कामे करत असे. घर आणि ऑफिस सांभाळताना तिची खूपच धावपळ होऊ लागली. पण तिची ही धावपळ तिच्या सासूबाईंच्या लक्षात कधी आलीच नाही .उलट सुनीताला आपल्याप्रमाणे नीट कामे जमत नसल्याची तक्रार त्या इतरांकडे करत असत. सतत च्या धावपळीचा परिणाम आता सुनीताच्या प्रकृतीवर आणि कामावर होऊ लागला. घरात कोणीतरी मदतीला असावे असे तिला प्रकर्षाने वाटू लागले. सासूबाईंनी ”माझ्याने आता होत नाही ” म्हणून कधीच हात वर उचलले होते. म्हणून निशांतशी चर्चा करून तिने घरकामासाठी बाई लावण्याचा निर्णय घेतला.त्याप्रमाणे तिने घराच्या साफसफाई साठी आणि स्वयंपाकासाठी बाई लावली. सासूबाईंनी खूप विरोध केला पण निशांत पुढे त्यांचे काही चालले नाही.
आता सर्व सुरळीत चालले होते. बाई लावल्यामुळे सुनीताला घर आणि ऑफिस व्यवस्थित मॅनेज करता येत होते. परंतु सासूबाईंच्या मनातील अढी कायम होती. आता तर सुनीता आपली मदतीची अपेक्षा न करता सर्व काही एकटयानेच सांभाळते आहे हे पाहून त्या अधिकच चिडल्या.घरातील आपले महत्व कमी झाल्यासारखे त्यांना वाटू लागले. त्यामुळे सुनीताच्या प्रत्येक गोष्टीत त्या चूका काढू लागल्या . घरी आलेल्या पाहुण्यांजवळ उगाचच तिच्या तक्रारी करू लागल्या. सुनीता समजदार असल्यामुळे तिने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले.
एके दिवशी निशांत चे काका काकू घरी आले होते . सुनीताने मावशींच्या मदतीने उत्तम स्वयंपाक केला . जेवण झाल्यावर काकू म्हणाल्या “सुनीता खरोखरच सुगरण आहेस हो तू .जेवण खूपच छान झाले होते “.सुनीता काही बोलायच्या आतच सासूबाई म्हणाल्या ” अग वीणा जेवण त्या बाईनी बनविले आहे. आमच्या सुनीताला कुठे करता येतोय स्वयंपाक .म्हणून तर बाई लावलीये . मला तर कधी गरजच पडली नाही स्वयंपाकासाठी बाई लावण्याची “.बाई ने स्वयंपाक बनविला ऐकून वीणा काकू कसेतरीच तोंड करू लागल्या आणि म्हणाल्या “अरेरे .. एवढी तरुण सून घरात असताना घरातल्या कामांसाठी बाई लावण्याची काय गरज. आमची जान्हवी तर स्वतःह सर्व बनविते तिला नाही आवडत कोणाच्याही हाताचे बनवून खाल्लेले”.”अग वीणा त्यासाठी सवय लागते कामे करण्याची आणि आई वडिलांचे संस्कारही असतात ते.पैसे असल्यावर काय गरज आहे स्वतःह सर्व करण्याची” सासूबाई सुनीताकडे पाहून खोचक स्वरात म्हणाल्या.
सासूबाईंचे हे बोलणे ऐकून सुनीताच्या तळपायाची आग मस्तकात गेली.ती म्हणाली “हो बनवलाय स्वयंपाक बाईने पण बनविताना लागणारे मीठ मसाल्याचे प्रमाण तर मीच ठरवलंय ना.आणि बाईने स्वयंपाक बनविला म्हणून काय झाले . ती पण तर माणसचं असतात ना. स्वतःह सर्व घरकाम करणारे चांगले असतात आणि बाई लावून घरकाम करवून घेणारे आळशी असतात असे कोणी सांगितले तुम्हाला? करवून घ्यायलाही तितकेच कौशल्य लागते.घरकाम करण्यासाठी लागणारा वेळ मी वाचवते आणि तो ऑफिसच्या कामासाठी वापरते.हा गलेलठ्ठ पगार मला उगाचच मिळत नाही त्यासाठी मी माझे रोजचे नऊ तास कंपनीला देते. या मिळालेल्या पगारातूनच आपल्या घराचा अर्धा emi भरला जातो,भविष्यात काही अडचण आली तर सेवींग्स पण यातूनच होते. मला वाटले तर मी सुद्धा नोकरी सोडून घरी राहू शकते , दुपारी आराम करू शकते परंतु एकट्या निशांत वर मला भार टाकायचा नाही . घराची अर्थिक जबाबदारी घेणे हे जसे त्यांचे कर्तव्य आहे तसे माझेही आहे. आणि तुम्हाला जर घरातले सर्व स्वतःह अगदी तुमच्यासारखी करणारी हवी होती तर मग तशीच सून शोधायची होती . सून नोकरी करणारी असावी हा अट्टाहास तुमचाच होता ना.काकू .. तुम्ही जान्हवी चे उदाहरण देताय मला.. जान्हवीच्या घरात किती लोक आहेत …फक्त ती आणि तिचा नवरा… त्यातही तिचा नवरा प्रत्येक कामात तिची मदत करतो.. अगदी भाजी चिरण्यापासून ते शिजविण्यापर्यंत. आई वडिलांचे संस्कार हे असतात. मला जर प्रत्येक जण एवढी मदत करणार असेल तर मी आत्ताच बाई सोडून देईल.बोला आई आहे तुम्हाला मंजूर?”
सासूबाई गप्प बसल्या. कधीही उलट उत्तर न देणाऱ्या सुनीताचा रुद्रावतार बघून त्या ही मनातून घाबरल्या. सुनीताला मात्र मन अगदी हलके झाल्यासारखे वाटत होते. आता सासूबाई परत कधीही ह्या विषयावर बोलणार नाहीत याची आता तिला खात्री होती